भागाई

तसं बघितलं तर भागाईचं या जगात कुणीही नव्हतं. नाही म्हणायला दोन-तीन बकऱ्या सोबतीला होत्या. मी प्रथम तिला बघितलं तेव्हा तिचे पहिले दर्शन खाष्ट म्हातारी असेच झाले.तिच्या खाष्टपणामागे दडलेली इतरांविषयीची काळजी आणि प्रेमळपणा लक्षात येण्याजोगे माझे वय नव्हते. 3री किंवा 4 थीत असेल मी! तरीही मी जरा तिच्यापासून फटकून आणि घाबरुनच राहत असे.

भागाईचे घर साधे मातीचे आणि धाबे असलेले असे होते. घराच्या पुढच्या दरवाज्याला एक छोटेसे फाटकही होते. आणि घरासमोरील जोतं इतक्‍या उंचीचं होतं की आम्हा लहान मुलांना त्यावरून चटकन उड्या मारता येऊ नये. आपल्या घराच्या उंबऱ्यात भागाई तिच्या समवयस्कांशी किंवा गल्लीतील बायकांशी बोलत बसलेली दिसे. या बाईचे व्यक्तिमत्व तसे साधेच. सुरकुतलेला चेहरा वय झाल्याचे व पूर्वीचे दिवस कष्टात गेल्याचे स्पष्ट दाखवित असे. दोन लुगड्यांच्या तुकड्यांपासून तयार केलेले ( दांड मारलेले) लुगडे भागाई नेसत असे. तिची गरिबी त्या फाटक्‍या कपड्यातून स्पष्ट डोकावून जात. भागाईला भागाई हे नाव कसे पडले किंवा तिचे मूळ नाव आडनांव काय हे माहित नाही परंतु लहानांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत सर्वच लोक तिला भागाई या नावानेच ओळखत असत.

तसा माझा आणि या भागाईचा संबंध फारच कमी येत असे. कारण एक तर ही म्हातारी अतिशय तोंडाळ होती. त्यामुळे ती कधी काय बोलेल ते सांगता येत नसे. त्यामुळे माझ्यासह माझे समवयस्क मित्र म्हातारीपासून जाणूनबुजून चार हात दूरच राहत असू. सुरुवातीला या म्हातारीविषयी आमची ही भावना होती. पण नंतर नंतर मात्र तिची बऱ्यापैकी ओळख की सवय झाल्याने तिच्याशी अधनंमधनं बोलणंही होत असे.

एकदा अशाच एका बोलण्यात तिने सांगितले की ती रहात असलेल्या त्या खेड्यातून जवळच असलेल्या नाशिकला उभ्या हयातीत कधी गेलीच नाही. पंचवटीतील काळाराम बघण्याची तिला फार इच्छा होती असे तिच्या बोलण्यातून जाणवले. आम्हाला मात्र नवल वाटले. एक व्यक्ति आपले सर्व आयुष्य एका गावात काढूच कसे शकते? याचे.

एकदा आम्ही चेंडू खेळत असताना तो नेमका भागाई राहात असलेल्या पाठीमागील अंगणात गेला. आता मोठा प्रश्‍न निर्माण झाला आमच्यापुढे. वाघाच्या गुहेत शिरायचे कोणी याचा! शेवटी हिय्या करुन मीच भागाईच्या घरात गेलो. दोन खणाचे लहानसे पण आतून व्यवस्थित शाकारलेले असे ते घर होते. लहानशा भिंतीने घराचे दोन भाग केलेले होते. बाहेरच्या भागात एक दोन शेळ्या घास खात होत्या आणि कोपऱ्यात एके ठिकाणी एक-दोन जुन्या गोधड्या आणि मळकट उशी इतक्‍याच वस्तू ठेवलेल्या होत्या.

दरवाजाच्या बाजूला एक काठी आणि एक प्लॅस्टिकच्या बुटांचा जोड ठेवलेला होता. पुरुषाच्या पायाचे ते बुट होते आणि पूर्वीच्या काळी आठवडे बाजारातून मिळायचे तसे ते पिवळसर लाल रंगाचे स्वस्त असे बूट होते. आतील खोल्यात एका कोनाड्यात एक पाळणेवजा देवघर आणि त्यात दोनचार दगड गोटे काही देवांचे टाक अशी सामुग्री होती. एखादी गाथा किंवा हरिपाठाचे पुस्तकही असावे. म्हातारी वारकरी होती. रोज बुक्का लावायची. अर्थात ती गंगा भागीरथी कधीच झालेली असावी. कारण ती तशी एकटीच होती. असो. शेवटी तो चेंडू मी मिळवला पण म्हातारीचे ते घर मात्र माझ्या कायमचे डोक्‍यात घर करून राहिले.

दिवस असेच जात राहिले. मीही आता 5 वी, सहावीत गेलो असेल. उन्हाळ्याच्या सुटीला नुकतीच सुरुवात झाली होती. दुपारची वेळ होती. मी घरात पलंगावर नुसताच लोळत पडलेलो होतो. दुपारी साडेबारा दीडच्या सुमारास बाहेर हातगाडी घेऊन भंगारवाला आला. सहज गंमत म्हणून मी त्याच्या हालचालींकडे आणि त्याच्याशी होणाऱ्या बाजूच्या लोकांच्या बोलाचालीकडे बघत होतो. इतक्‍यात समोरुन भागाई बाहेर आली तिच्या हातात काही वस्तू होत्या. भंगारवाल्याला त्या देवून काही चार आठ आणे मिळाले तर बरे हा त्यामागचा स्पष्ट उद्देश होता. एक दोन वस्तूंचे वजन झाल्यावर म्हातारीने एक बुटाचा जोड भंगारवाल्याला दिला. तोच जोड जो मी म्हातारीच्या घरी कोपऱ्यात पाहिला होता. आता मी जास्तच कुतुहलाने तिकडे पाहू लागलो. त्यांच्या बोलाचाली वाढायला लागल्या. भंगारवाल्याने बुटाचे आठ आणे द्यायचे कबूल केले. पण म्हातारी मात्र ऐकायला तयार नव्हती. ती जास्त पैसे मागत होती. किमान एक-दीड रुपया तरी असावा.

भंगारवाला भागाईच्या ओळखीचा असावा. शेवटी वैतागून म्हणाला “भागाई तुम्ही येवड्या का मागं लागता ? या जुन्या बुटाचे मी तरी किती देणार?’ त्याचे बोलणे ऐकले मात्र भागाईच्या चेहऱ्याचे रंग बदलत गेले. आवाज थोडा क्षीण झाला आणि काहीशा समजावणीच्या आणि काहीशा गदगदलेल्या स्वरात ती म्हणाली, भाऊ अरे ही माझ्या म्हाताऱ्याची शेवटची आठवणंय रे !

म्हातारीच्या या बोलण्याचा त्या भंगारवाल्यावर काय परिणाम झाला माहित नाही परंतु माझ्या काळजात मात्र चरर्र झाल्यासारखे वाटले. हा प्रसंग मनात कायमचा कोरला गेला. त्या दिवसापासून भागाईकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्ण बदलला. म्हणजे म्हातारीची परिस्थिती इतकी खालावली होती की नवऱ्याची प्रेमाने जपून ठेवलेली आठवण, त्याचे जोडे तिला अखेर भंगारवाल्याकडे विकायला काढावे लागले.

आजही हा प्रसंग मनात ताजा आहे. त्याकडे जेव्हा बघतो तेव्हा वाटते की गरिबांना आठवणी जपण्याचाही अधिकार आहे की नाही? वडिलांच्या बदलीमुळे मी सातवीत असताना ते गाव आम्हाला सोडावे लागले. त्यानंतर चार-पाच वर्षांनी त्या गावी पुन्हा जाण्याचा योग आला. भागाई राहात होती त्या घराकडे अवश्‍य गेलो. तिथे आता कुलूप होते. भागाई हयात होती की नव्हती कळाले नाही. पण त्या घराकडे बघताना भागाईचे तेच शब्द मात्र माझ्या मनात पुन्हा उफाळून आले, “”भाऊ अरे ही माझ्या म्हाताऱ्याची शेवटची आठवणंय रे !

 

पंकज प्र. जोशी

mr.pankajjoshi@gmail.com

Advertisements

5 comments

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s