विहिरीवरची आठवण…

मित्रा, असा कसा रे गेलास? जेव्हा समजले ना तेव्हा खूप वाईट वाटले, एवढा जवळचा मित्र असून शेवटचे दर्शन सुद्धा घेता आले नाही. या ई-विश्‍वात मन मोकळे करून मी तुला माझी श्रद्धांजलीच वाहत आहे….

मित्रा, तू गेल्याचे कळले आणि सर्वांप्रमाणे मलाही खूप दुःख झाले रे. मित्र, सखा असून तुझे शेवटचे दर्शन मला घेता आले नाही. याचे आजही खूप दुःख होत आहे. तुझी आठवण मला फक्त सकाळी येते रे? त्यामागील कारण म्हणजे, तुला माहीत आहे. आपण रोज सकाळी मळ्यातल्या विहिरीवर डुबक्‍या मारायचो. मला माहीत आहे. तू फक्त माझ्यासाठी विहिरीवर पोहायला यायचा, विहिरीत सुर मारायला, विहिरीचा तळ गाठायला मला तूच शिकवले ना रे? मित्रा तुला तो किस्सा आठवतो का रे? आठव आठव बरे… नाही ना आठवत. थांब मीच आठवण करून देतो.

आपण सहावीत असताना दोघेच विहिरीवर पोहोत होतो. वस्तीवरील महिला पाण्यासाठी आलेल्या आणि, माझी कपडे तू लपवून ठेवलेली. मी किती वेळ पाण्यातच होतो. माझी अवस्था पाहून तुला झालेला आनंद अन्‌ माझी केविलवाणी झालेली अवस्था. तीनही ऋतूत आपण किती मज्जा करायचो ना रे? मी गावाला गेलो ना त्या विहिरीकडे मला पाहवत नाही रे, आपण जिथून डुबक्‍या मारायचो ना… तो दगड सुद्धा अजून तसाच आहे, पण मी ना फक्त त्या दगडाकडे, विहिरीकडे पाहून परत येतो रे, ती विहीर सुद्धा मला एकट्याला पोहून, डुबक्‍या मारून नाही देत रे, ती माझ्याशी चक्क बोलते सुद्धा, तू एकट्याने नाही पोहायचे, त्यावेळी माझ्याकडे काहीच उत्तर नसते रे, हताश मनाने, त्या दगडाकडे, विहिरीकडे पाहून हताश मनाने परत फिरतो.

लाली गाई, आगाज्या बैल सुद्धा गेला रे. सुटीच्या दिवशी आपण कुरणात गुरे चारताना किती मोठ्याने कविता म्हणून पाठ करायचो. मला आजही तो घुमणारा आवाज आठवतो. मला झाडावरून उड्या मारायला पण तसे तूच शिकवले. खरच तू म्हणायचा ना मी घाबरट आहे. पण आता तसा राहिलेलो नाही रे. फरक फक्त एवढाच आहे, की मला पहायला तू नाहीस. आपण किती-किती गप्पा मारायचो ना, एकत्र अभ्यास करताना डबा खाताना किती मजा करायचो. तू बोरे आणून मला द्यायचास. पण मला तुझ्या इतके नव्हते ना जमत. तू नेहमी म्हणायचा की, मी नेहमी तुझ्या पुढे असणार. आणि खरोखरच तू ते खरे करून दाखविले. या जगाचा निरोपसुद्धा तू पहिला घेतलास. आणि जाताना सुद्धा पहिलाच नंबर पहिलाच ठेवला ना? हे तू सर्व पहिल्या नंबर साठी केलेस का?

माझा बालपणीचा मित्र दशरथ पिंगळे याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली…

– संतोष धायबर

santosh.dhaybar@gmail.com

22 comments

यावर आपले मत नोंदवा