माझे आप्पा

प्रत्येकाच्या जीवनात एक तरी आप्पा कधी ना कधी तरी आलेले असतात – आजोबा, काका, मोठे भाऊ, वडिल अशा अनेक रुपाने. माझ्या आयुष्यात ते आले आजोबांच्या रुपाने. माणूस खूपच देखणा हो, रुंद कपाळ, घारी सारखे नाक आणि गडगडाटी हास्य. आजही ह्या तीन गोष्टी कुठेही दिसल्या की त्यांचीच आठवण येते. मला ते कसे गेले हे सांगण्यापेक्षा ते कसे जगले हे सांगायला जास्त आवडेल. मी अगदी लहान म्हणजे 6 महिन्याचा असल्या पासून त्यानी आणि माझ्या आजीने माझा सांभाळ केला. त्यानी माझ्यावर मोठा नातू म्हणुन जीवापाड प्रेम केले. त्या प्रेमात अपार करुणा असायची, माझ्याबद्दल असणारा जिव्हाला क्षणोंक्षणी जाणवायचा. मी लहान असताना त्यानी आणि माझ्या आजीने माझे आई आणि बाबा दुसरया गावी असल्याची कधीच जाणीव होऊ दिली नाही.
 
ते रेल्वे मध्ये काम करायचे आणि मला अजुनही आठवते त्यांची ती मोठी सायकल जी हातात घेउन बरोब्बर संध्याकाळी ५:३० वाजता ते आणि त्यांचे मित्र घरी यायचे आणि दोघेही कुठल्याश्या विनोदावर खळखळउन हसायचे. सगळ्याना मदत करायला सदैव तत्पर आणि तयार. त्यानी जितक्या आप्त्स्वकियांच्या मुला-मुलींच्या लग्नात तहानभूक विसरून कामे केली किंबहुना त्यापेक्षा जास्त स्मशानाच्या वार्र्या केल्या. लग्नकार्य असू देत वा अन्तिम संस्कार, ह्या दोन्ही वेळी पुढाकार घेणारा माणूस लागतो आणि माझे आप्पा त्या माणसाच्या रुपाने नेहमी म्हणजे अगदी नेहमी पुढे व्हायचे. त्या वेळी मी लहान होतो पण लग्नकार्य सुखरूप पार पडल्यानंतर यजमानांच्या चेहरयावर असलेला आप्पांविषयीचा कृतद्न्यतेचा भाव मला तेंव्हाही लक्षात यायचा. कुठल्याही क्षेत्रात ते मोठे झाले नसतील कदाचित, पण माणूस म्हणून खूप मोठे होते ते. किंबहुना माणूस म्हणून जगण्याची त्याना गोडीच होती. तारुण्यात स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला वाहून घेतलेला हा माणूस माझे आजोबा होते हे मी माझे भाग्यच समजतो. 
 
२००५ साली जुलाई महिन्यात किडनीच्या विकाराने त्यांचे निधन झाले. तेंव्हा मी अमेरिकेमध्ये माझे शिक्षण घेत होतो. त्यांच्या अन्तिम दर्शनासाठी मला तिकडे जाता नाही आले आणि त्याची खंत मला आयुष्यभर लागून राहिल. आजही ते माझ्या स्वप्नात येतात आणि माझ्या पाठीवरून मायेचा हात फिरवून हलकेच निघून जातात.
 
भूषण बोरोटीकर  
क्लीवलैंड, ओहायो 

borotib@ccf.org

3 comments

  1. Thanks guyz! I really appreciate your feedbacks that tell me how lucky i was to get such kind of unconditional love from my grandparents. Maggi, I wouldn’t say that you are unlucky, because, by not loving your family, your grandfather taught you what not to do or something that YOU will never do with your family or children!!

यावर आपले मत नोंदवा