आबा!

आबा म्हणजेच माझे, परमपूज्य वडिल. त्यांच्याविषयी लिहावे तेवढे थोडेच. वडिल म्हणजेच छत्र! माणूस वयाने अथवा पैशाने कितीही मोठा झाला व वडिल नाहीत तर खरोखरच पोरका, निदान मला तरी जाणवते.

माझे आबा गेले आणि माझ्या जीवनात पोकळी निर्माण झाली. मी वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडले पण नेहेमी मला भास व्हायचा की ते मला सूचना देतात, मार्गदर्शन करतात.

मला अनेक प्रसंग आठवतात त्यातील एक,
मला बैल गाडीचा मोठा अपघात झाला होता. एरवी रक्त पाहिल्यानंतर चक्कर येणारे आबा; त्यांनी माझ्या जखमा स्वत:च्या हातानी दाबून धरून रक्त थांबविण्याचा प्रयत्न करत होते. किती मनावर ताबा राखला असेल त्यांनी !

गरीबीमुळे आम्हा मुलांना व स्वत: त्यांना पायात चप्पल घेऊ शकत नव्हते. रस्ता बिकट असेल तर आम्हा भावंडांना ते खांद्यावर घेत ( आमचे वय तेव्हा ११-१२ वर्षांचे असेल) माझ्या शिक्षणाची फी भरण्यासाठी शेताला आणलेली खताची पोती त्यांनी विकली. अशा रितीने स्वत: कष्ट घेऊन आम्हा मुलांना शिक्षण दिले. अशा माझ्या प्रेमळ कर्तव्यदक्ष व प्रसंगी कठोर अशा आबांना भावपूर्ण श्रद्धांजली !
श्रद्‌धांजली अर्पण करताना दोन ओळी ओठावर येतात व डोळ्यात अश्रू उभे राहतात.

केला तुम्ही पहारा माझ्या सभोवताली
स्मृतीत आज त्याच्या गात्रे भिजून गेली ।।

तुमचा
दत्ताजीराव

दत्ताजी नारायण पाटील,
मु.पो.कासारी, ता. कागल
जि. कोल्हापूर
सध्या वास्तव्य – पुणे.

dattajirao@gmail.com

यावर आपले मत नोंदवा